आता कोकण प्रवास होणार 'सुपरफास्ट' !

'वंदे भारत'ची कोकण रेल्वे मार्गावरील ट्रायल रन सक्सेस फुल !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2023 15:28 PM
views 235  views

सावंतवाडी : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कोकणातील प्रवास सुखकारक आणि वेगवान होणार आहे. कोकणवासीयांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. आज या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. दुपारी १२ वाजता ही 'वंदे भारत' एक्सप्रेस कोकणातील व महाराष्ट्रातील शेवटच रेल्वे स्थानक असणाऱ्या सावंतवाडीतून गोव्याला रवाना झाली. मुंबई ते मनमाड या दरम्यान ही ट्रायल रन घेण्यात आली. 


मुंबईवरुन चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. आज पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. या ट्रायल रनसाठी मुंबईच्या सीएसएमटी जंक्शन इथून सकाळी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. ही एक्स्प्रेस दुपारी बारा वाजता सावंतवाडीत तर अडीच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. कोकण रेल्वे मार्गावरील ही ट्रायल रन यशस्वी झाली असून या मार्गावरुन 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावली. कोकण रेल्वे मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोकणवासीयांना या रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.


 दरम्यान, भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस अनेक ठिकाणी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या राज्यात तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. लवकरच राज्यात चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर मुंबई- शिर्डी अशी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. आता चौथी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच कोकण मार्गावर धावणार आहे. तळकोकणात देखील या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.