POP ची बंदी उठवली | पारंपारीक मुर्तीकारांच्या भावनांची किंमत केली ? | मंत्री केसरकरांना कोकणातील मुर्तीकारानं पत्र लिहीत व्यथा मांडली

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 16:29 PM
views 403  views

सावंतवाडी : यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्ती बनवायला बंदी नाही. मात्र, या मुर्तींच विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केलं. यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. या निर्णयानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः त्यांच्या मतदारसंघातील एका पिढ्यानपिढ्या मातीचं मुर्तीकाम करणाऱ्या गणेश मुर्तीकारानं थेट मंत्री केसरकरांना पत्र लिहीत मुर्तीकारांच्या भावनांसह आपली व्यथा मांडलीय.

ते पत्रात म्हणातायत, मा.दीपकभाई केसरकर शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य. महाशय, आपण विधानभवनात POP गणेशमूर्ती बाबत जे विधान केलत. त्यामुळे मातीच्या मूर्ती करणाऱ्या गणेशमूर्तीकारांच्या भावना दुखावल्या गेल्यात. POP मूर्ती बंदी संदर्भात अनेकवेळा आम्ही भेटलो निवेदन दिली. पण, आश्वासना पलीकडे काहीच मिळालं नाही. त्याचं उत्तर आज मिळालं !

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यादृष्टीने गणपती विसर्जनानंतर अनेक महिने नदी, नाले, तलाव समुद्राकिनोर येथे जे आमच्या दैवताचं विदारक स्वरुप दिसतं. त्यामुळे ज्या वेदना होतात त्या आपण पहाव्यात. आपण धार्मिक आहात. हिंदू धर्मशालात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी ही गणेश मूर्तीची पूजा करून केली जाते. पार्वती मातेन आपल्या अंगाची मळकाढून गणेशमूर्ती तयार केली. ती आदिमाया पृथ्वीमाता जीच्या अंगाखांद्यावर आपण नाचतो, घाण करतो. पण, आईला कधी राग येत नाही. तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मानव वर्षातून तीन वेळा तिची पूजा करत असतो. नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती व गणेश चतुर्थी.

मग, POP मूर्ती निर्मिती कशी झाली ? ती व्यापारी वृतीतून, मॉडेल तयार करून घेऊन त्यावर व्यवसाय करणे. मूर्ती तयार करणारा वेगळा आणि प्रोडक्शन करून विकणारा वेगळा. त्यामुळे मूर्ती तयार करणारा कारागिरी हा बाजूलाच रहातो. त्याला एका मूर्तीचे मूल्य मिळते. पण, व्यापारी प्रोडक्शन करणारा लाखो रुपये कमावतो मूर्तीकार तसाच रहातो.

ज्या ठिकाणी POP प्रॉडक्शन होत त्याठिकाणी मूर्तीकार कुठले आहेत ते पहा. त्याच मूळ सिंधुदुर्गात आहे. मातीच्या मूर्ती तयार केल्याशिवाय मूर्तीकार तयार होणार नाही. सिंधुदुर्गात तरुण मुले शिकून आली आहेत. त्यांनी आपला मुर्तीशाळा सूरू करत व्यवसाय सूरू केला आहे. जर POP ला प्रोत्साहन दिलंत तर त्यांच भवितव्य काय ? आज जे POP गणेशमूर्ती विकतात. त्या हमरापूर कोल्हापूर येथून आणल्या जातात. ते मूर्तीकार स्वतः मूर्ती करू शकत नाहीत. त्यामुळे मातीच्या मूर्त्या तयार करणारे पिढ्यानपिढ्या ज्याचा व्यवसाय आहे त्याच्या तोंडातला घास काढून घेतला जात आहे.

असच चाललं तर थोड्याच दिवसात सिंधुदुर्गातील मूर्तिकला नष्ट होणार आहे. त्याला काहीअंशी तुम्ही जबाबदार असाल. कृती प्रथम घडते इतिहास नंतर किहिला जातो अशी भावना श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पारंपारीक मुर्तीकारांच्या भावना त्यांनी मांडल्या आहेत.