
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या वेळेस कांबळे यांच्या खाजगी जमिनीत खोदाई केल्यामुळे नुकसान झाल्याने पंकज कांबळे आज उपोषणाला बसले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या वेळी ठेकेदार कंपनी के सी सी बिल्डकॉन यांनी राजापूर तालुक्यातील कोंड्ये गावातील पंकज कांबळे यांच्या खाजगी प्लॉट मध्ये खोदाई करून मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. पाईप लाईन टाकायचे कारण सांगून ही खोदाई सुरू होती. यासंदर्भात महसूल प्रशासनानेही याच जमीन मालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला होता.
यामुळे या जमीन मालकांवर अन्याय झाला होता. जमिनीमध्ये खोदाई करून जमीन मालकांचे नुकसान झाले होते. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अशा कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज १५ ऑगस्ट रोजी वैशाली गणपत कांबळे, पंकज गणपत कांबळे हे न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसले होते. ही बाब समजताच सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्वा किरण सामंत यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
उपोषणकर्ते कांबळे उभयतांशी सविस्तर चर्चा केली. आणि योग्य आश्वासन मिळाल्यामुळे अपूर्वा किरण सामंत यांच्या विनंतीनुसार वैशाली कांबळी आणि पंकज कांबळी यांनी उपोषण सोडले. यावेळी तालुका संघटक भरत लाड, विभाग प्रमुख नाना कोरगावकर, कोंड्ये उप विभाग प्रमुख अजित घाणेकर, शेजवली सरपंच मंदार राणे, कोंड्ये उपसरपंच महेश कारेकर, शाखा प्रमुख गणेश घेवडे, संदीप राऊत तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.