LIVE UPDATES

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न : पालकमंत्री नितेश राणे

नाधवडे येथे भातपिकांची पाहणी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 19:57 PM
views 10  views

वैभववाडी : कोकणातील पिकांची यंदाची स्थिती अत्यंत चिंताजनक असून, अशी भयावह परिस्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. या पाहणीतून मिळालेली वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

पालकमंत्री राणे यांनी रविवारी सकाळपासून जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी दौरा केला . त्यानंतर सायंकाळी त्यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे शेतकऱ्यांच्या भातपिकांची पाहणी केली.नाधवडे येथील शेतकरी अक्षय लक्ष्मण हिवाळकर यांच्या शेतातील भातपिकांची पाहणी करताना पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याचे निदर्शनास आले. तसेच पिकांमध्ये पोचटाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पालकमंत्री राणे यांनी परिसरातील विहिरीतील पाणीपातळीचीही पाहणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विहिरीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी त्यांना दिली.पुरस्कारप्राप्त शेतकरी महेश संसारे, प्रमोद रावराणे आणि भालचंद्र साठे यांच्याकडून पालकमंत्र्यांनी तालुक्यातील अन्य भागांतील पिकांची स्थिती जाणून घेतली. नदी, नाले तसेच धरणांमधील पाणीसाठ्याची परिस्थितीही त्यांनी जाणून घेतली.

यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, ‘‘कोकणावर मोठे संकट आले आहे. अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी कोकणात पाहायला मिळालेली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. या पाहणीतून मिळालेली माहिती शासनापर्यंत पोहोचविली जाईल.’’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुष्काळाच्या ‘ट्रिगर एक’मध्ये समावेश केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणीतून समोर आलेली वस्तुस्थिती शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे मांडता येईल. त्याआधारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही राणे यांनी सांगितले. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, प्रमोद रावराणे, नीरजंन देशमुख, सुधीर नकाशे, महेश संसारे, नासीर काझी, भालचंद्र साठे,प्राची तावडे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, दिगंबर मांजरेकर, सुवर्णा संसारे, मंगेश लोके, देवानंद पालांडे, साधना नकाशे, रिना पाचांळ आदी उपस्थित होते.