LIVE UPDATES

संत रोहिदास पतसंस्थेत अध्यक्ष गोविंद वाडकरांकडून अधिकाराचा गैरवापर

बाबुराव चव्हाण यांचा आरोप
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 19:52 PM
views 8  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक मतदानासाठी प्रतिनिधी पाठवण्याच्या मुद्द्यावरून संत रोहिदास सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा गैरवापर करत संस्थेचे अध्यक्ष गोविंद वाडकर हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, या प्रकाराच्या विरोधात आम्ही सहाय्यक निबंधक आणि सचिवांकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे वेळीच हा प्रकार थांबला नाही तर त्यांच्या विरोधात आपण फौजदारी दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे. संस्थेच्या मासिक बैठकीत जिल्हा बँक मतदानासाठी प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपल्याकडे चार मते होती. तर अध्यक्षांच्याबाजूने तीन मत होती. अशावेळी स्वीकृत सदस्याचे मत विचारात घेऊन श्री. वाडकर यांनी अध्यक्षीय मत नोंदवत पाच मत असल्याचा दावा केला. मात्र, स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार नसून कार्यकारिणीतील सात पैकी चार जणांनी मला अनुमोदन दिलं आहे. मात्र, श्री. वाडकर यांनी आपल्यासह दोन सदस्य व स्वीकृत सदस्य असल्याचे सांगत अध्यक्षीय मत मिळून पाच मते असल्याचा दावा केला आहे. परंतु, त्यांच्याकडे प्रत्यक्ष तीनच मते आहेत. स्वीकृत सदस्याचे मत विचारात घेतले जाणार नसून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ते संस्थेसह सर्व सभासदांना वेठीस धरत आहेत‌. हा सर्व प्रकार चुकीचा असून याबाबत आम्ही सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबावावा. अन्यथा, आम्ही यासंदर्भात फौजदारी दाखल करू असा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी संचालक गणेश म्हापणकर ,परशुराम चव्हाण आदी उपस्थित होते.