
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, कचरामुक्त जिल्हा अभियानांतर्गत शहरांमध्ये कचराकुंड्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली.टोलबाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मंत्री राणे यांचे आभार मानले. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा आली.यावेळी व्यापारी महासंघाच्या कार्यालयासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन निधीतून सर्व बाजारपेठांसाठी कचराकुंड्या देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यातील बाजारपेठांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. तसेच परप्रांतीय फिरत्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महासंघामार्फत ओळखपत्रे देण्याची सूचना त्यांनी केली.
जिल्ह्यात व्यापार आणि उद्योगवृद्धीसाठी सकारात्मक चर्चा झाली असून, दर तीन महिन्यांनी व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीसोबत बैठक घेण्याचे आश्वासनही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले, अवधूत शिरसाट, पुंडलिक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.










