दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुकानात

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 26, 2026 17:55 PM
views 252  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी एक मोठा अपघात घडला. मळगाव सुतारवाडी सर्कलवर रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक जेवण्यासाठी घरी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला असलेले आणि मूळचे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक सुट्टीनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार (23 BH 8533 A) मधून गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ आले असता, एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला.

त्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे चालकाचा ताबा सुटून कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि महामार्गावर उलट दिशेने फिरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या काजूगर विक्रीच्या स्टॉलवर जाऊन जोरात धडकली. हा काजू विक्रीचा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील रहिवासी मंगेश राऊळ यांच्या मालकीचा आहे. अपघात झाला त्या वेळी राऊळ हे योगायोगाने जेवण करण्यासाठी घरी गेले होते. ते जेवण करून पुन्हा दुकानाच्या दिशेने येत असताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. जर ते त्या वेळी दुकानात असते, तर मोठी दुर्घटना  होण्याची शक्यता होती. या अपघातात दुकानाचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ गजानन सामंत, सुभाष राऊळ, सतीश राऊळ, महादेव राऊळ, दीपक जोशी, श्यामसुंदर राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला.

 घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मनोज राऊत, दीपक शिंदे, ट्राफिक पोलीस गुरुनाथ नाईक, चालक मयूर निरवडेकर आणि पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार किंवा खबर नोंदवण्यात आली नव्हती.