
वैभववाडी : तालुक्यातील नावळे आणि कुर्ली गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे.त्यामुळे येथील नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांत बीएसएनएलचे मोबाईल टॉवर मंजूर व्हावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुतार यांनी कणकवली येथील निवासस्थानी मंत्री राणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.यावेळी त्यांच्यासोबत लोरे सरपंच विलास नावळे, माजी सरपंच नाना रावराणे, रितेश सुतार, सत्यजित रावराणे उपस्थित होते.
सुतार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,नावळे आणि कुर्ली गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत असून शासकीय कामकाजातही व्यत्यय येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच गावकऱ्यांना दैनंदिन व्यवहार, बँकिंग सेवा, ऑनलाइन सुविधा तसेच आपत्कालीन संपर्क साधताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करून या दोन्ही गावात बीएसएनएलचे टॉवर मंजूर करावेत, अशी मागणी सौ सुतार यांनी केली आहे.या मागणीवर पालकमंत्री राणे यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.










