
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद आणि कुडाळ नगरपंचायत या जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सध्या कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. सध्या जिल्हा नगरपंचायत अधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे या दोन्ही ठिकाणचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला असून एकाच अधिकाऱ्याला तीन ठिकाणची जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विनायक औंधकर हे मूळचे जिल्हा नगरपंचायत अधिकारी म्हणून सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत आहेत. मात्र, सावंतवाडी आणि कुडाळ येथे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने या दोन्ही महत्त्वाच्या शहरांचा पदभारही त्यांच्याकडेच आहेत. औंधकर हे तिन्ही ठिकाणी उपस्थित राहून कामकाज हाताळत असले तरी एकाचवेळी तीन कार्यालयांचा गाडा ओढताना त्यांची चांगलीच कसरत होत आहे. या संदर्भात सावंतवाडीचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेतली असता, त्यांनी आपण तिन्ही ठिकाणी पुरेसा वेळ देऊन कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासकीय पातळीवर हे काम कितीही सक्षमपणे होत असले तरी जनतेमध्ये मात्र असंतोष पाहायला मिळत आहे. एका अधिकाऱ्याकडे तीन ठिकाणची जबाबदारी असल्याने नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या वेळेनुसार वाट पाहावी लागत आहे. मुख्याधिकारी जेव्हा नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय बैठकांमध्ये व्यग्र असतात, तेव्हा सामान्य नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी किती आणि कसा वेळ मिळेल? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. चार वर्ष प्रशासकीय राजवटीत अनेक काम रखडलेली असताना आता अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी त्यांच्या सवडीची प्रतिक्षा नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे शहराला स्वतंत्र व कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.










