सोनुर्ली नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंतीचं आयोजन

शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 26, 2026 17:03 PM
views 19  views

सावंतवाडी : सोनुर्ली-जाधववाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, त्रिसरण पंचशील आणि बुद्ध पूजेने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता आयोजित अभिवादन सभेत 'भारतीय संविधान, आमचा प्राण' या विषयावर फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिव आयू. महेंद्र मातोंडकर यांचे प्रमुख व्याख्यान होणार असून, या सभेला सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय सुस्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या जयंती उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मंडळाने आयोजित केलेली 'रील स्टार' स्पर्धा. 'काव्य रमाईचे, दिव्य भीमाचे' या विषयावर आधारित ६० ते ९० सेकंदांच्या व्हिडिओंच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडणार असून, यामध्ये प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ३५००, २५०० आणि १५०० रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या उपक्रमासोबतच दुपारी २ ते ५ या वेळेत आय केअर सावंतवाडी यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ वाजता गावातून भव्य 'जयभीम रॅली' काढण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महिलांच्या प्रबोधनासाठी 'पदर रमाईचा' हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यामध्ये विजेत्या महिलांना पैठणी व साड्यांची बक्षिसे दिली जातील. रात्री ८:३० वाजता समूह भीमगीत गायन स्पर्धेने या सोहळ्याची सांगता होईल. या स्पर्धेचे परीक्षण आयू. सुनील मयेकर आणि डॉ. आनंद राथवे करणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याला सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गांवकर, लक्ष्मीदास ठाकूर, नागेश गांवकर आणि सतीश सोनुर्लेकर यांसह परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांनी केले आहे.