
वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने वैभववाडी लोकोत्सवाचे आयोजन केले आहे.याचा २४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ ते २६ मार्च या कालावधीत वैभववाडी लोकोत्सव रंगणार असून, महिला व बालकांसाठी विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांसाठीही अनेक मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी महिलांना व मुलांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विजेत्यांना गृहपयोगी आकर्षक व किमती वस्तू बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत. लोकोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता होणार असून समारोप गुरुवारी रात्री ८ वाजता होईल. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याचा शिक्का, टीव्ही, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रिक टिफिन यांसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे. या लोकोत्सवात तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी व मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केले आहे.










