मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे ९० वर्षीय निवृत्त सैनिक विठ्ठल सावंत यांचा गौरव

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 22, 2026 19:14 PM
views 15  views

सावंतवाडी : भारत-चीन, भारत-पाक आणि इस्रायलमधील कठीण युद्धप्रसंगात शत्रूशी दोन हात करून देशरक्षण करणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे ९० वर्षीय निवृत्त सैनिक विठ्ठल बाबाजी सावंत यांचा जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने गौरव करण्यात आला. एका खऱ्या देशसेवकाच्या सानिध्यात येणे हे माझे भाग्य असून, अशा सैनिकांच्या चरणस्पर्शाने मला ईश्वरी साक्षात्काराचा अनुभव आला," अशा शब्दांत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हा ग्रंथालय संघ आणि 'कोमसाप'च्या वतीने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेटी देण्याचा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील 'सैनिकी गाव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलंबिस्त दशक्रोशीला भेट देण्यात आली. यावेळी वयाची नव्वदी पूर्ण केलेले आणि आजही सुदृढ आयुष्य जगणाऱ्या विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी विठ्ठल सावंत यांनी आपला खडतर जीवनप्रवास उलगडला. त्यांनी बेळगाव येथून मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रवेश केला आणि १५ वर्षे सेवा बजावली. १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि १९७२ च्या भारत-चीन युद्धातील प्रसंग त्यांनी सांगितले. तसेच, इस्रायलमधील दीड वर्षाच्या युद्धाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, देशसेवा हीच खरी जीवनाची सार्थकता आहे. युद्धाच्या निमित्ताने संपूर्ण देश आणि जग पाहता आले. आजचे युद्ध तंत्रज्ञानाचे असले तरी, आमच्या काळातील समोरासमोरची लढाई कठीण होती. मला मिळालेली पदके हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे.

मंगेश मसके पुढे म्हणाले की, "मी केवळ माझ्या आईला आणि साहित्यिक गुरु पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनाच वंदन करतो. मात्र, आज या वीर योद्ध्याचे पाय शिवताना माझे मन भारावून गेले. आज आपण जे सुखी आयुष्य जगत आहोत, ते या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच शक्य झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी देश जपला, म्हणूनच आज समाज सुरक्षित आहे. जिल्हा संचालक ॲड. संतोष सावंत यांनी विठ्ठल सावंत यांच्या कार्याचा आढावा घेतला. सैन्यदलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी कुडाळ येथील वायमन गार्डनमध्ये २० वर्षे सेवा दिली. त्यानंतर कृषी, पशुसंवर्धन आणि आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे वाचन आणि संवाद कौशल्य आजही तरुण पिढीला लाजवणारे आहे. या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा संचालक गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे उपाध्यक्ष रमेश सावंत, सैनिक पतसंस्थेचे सिद्धेश सावंत, वैष्णव सावंत, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, स्मिता शेट्ये, श्रद्धा सावंत, रुक्मिणी सावंत, संदीप सावंत, साधना सावंत आणि सावंत कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.