
वैभववाडी : उंबर्डे येथे यशवंत मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जि.प. सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांच्या शुभहस्ते झाले.उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रिया व उपचार व्हावेत या उद्देशाने मुंबई येथील ट्रस्टने या शिबिराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी पं.स. सदस्या साची कोलते, सरपंच वैभवी दळवी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नॅबचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. विपुल गांधी (मुंबई), उपसरपंच सतीश तुळसणकर, माजी सरपंच शेरपुद्दीन बोबडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील नेवरेकर, कुंभार समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव नेवरेकर, माजी उपसरपंच श्रीधर खेडेकर, अनिल पाटील, संतोष नेवरेकर, रत्नाकांत बंदरकर तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी आरोग्य सेवा ही समाजसेवेची खरी ओळख असून अशा उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना मोठा आधार मिळतो, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. तसेच या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदेश तुळसणकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे पदाधिकारी, डॉक्टर, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.










