कुर्लीत शेत विहिरीत पडून गव्याचा मृत्यू

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 21, 2026 19:15 PM
views 136  views

वैभववाडी : कुर्ली - टेंबवाडी नजीक बोंडकपाणी येथील शेत विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ( ता.२०) सायंकाळी निदर्शनास आली. आज वनविभागाच्या रेस्कूपथकाकडून मृत गव्याला बाहेर काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

कुर्ली टेंबवाडी नजीक बोंडकपाणी येथे पांडुरंग पाटील यांची शेतविहीर आहे.सुमारे १५ते २०फुट खोलीची ही विहीर आहे.श्री पाटील हे शुक्रवारी सायंकाळी शेतविहीरीकडे गेले असता, त्यांना विहीरीत गवा पडला असल्याचे निदर्शनास आले.त्यांनी ही माहिती गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांना दिली.श्री.हुंबे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.यानंतर शुक्रवारी सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली असता,गवा मृत अवस्थेत होता.त्यानंतर आज सकाळी कणकवली येथील रेस्कूपथकाला पाचारण करण्यात आले.

या पथकाने जेसीबीच्या साह्याने मृत गव्याला बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोडे यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार गव्याचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.हा गवा ७ते ८ वर्षाचा असून तो नर जातीचा होता.शवविच्छेदनानंतर त्याच दहन करण्यात आले .या कारवाईवेळी वैभववाडीचे वनपाल हरि लाड, वनरक्षक अनिल राख, नंदू लोखंडे, विनायक कयळकर, कुर्ली पोलीस पाटील प्रदीप पाटील, माजी उपसरपंच सुर्यकांत पाटील , प्रदीप पाटील तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात गव्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांचा मनुष्यवस्तीत वावर वाढू  लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वनविभागाने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.