महापुरुष मंदिराच्या महाउत्सवाचा दिमाखात शुभारंभ

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 21, 2026 19:47 PM
views 27  views

कणकवली : शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापुरुष मित्रमंडळाने यापुढील काळात आरोग्य क्षेत्रातही भरीव काम करावे, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केली. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला आपले सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘महापुरुष महाउत्सवा’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, सुमेधा अंधारी, आर्या राणे, नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, राकेश राणे, दादू राणे, मनस्वी ठाणेकर, संजय कामतेकर, महापुरुष मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, माजी अध्यक्ष राजू सापळे,राजन पारकर,सचिव महेंद्र सांब्रेकर, खजिनदार मंदार सापळे,राजु मानकर,चैताली मुंज, वैशाली काणेकर,अमित सापळे,साकेडीचे उपसरपंच  प्रज्वल वर्दम,प्रद्युम मुंज,चेतन अंधारी,निखिल घेवारी,सोहम वाळके,उदय मुंज,विशाल उर्फ दादा मुंज, अक्षय डिचोलकर,संदीप अंधारी वृषभ मेनकुदळे, महेश अंधारी, प्रसन्ना देसाई हरीष उचले,रोशन मांगले,आदी मान्यवर उपस्थित होते. 

नलावडे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही चिंताजनक बाब आहे. कणकवली शहरात कॅन्सर व हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. विशेषतः तरुण पिढीत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. शहरवासीयांच्या हितासाठी महापुरुष मित्रमंडळाने आरोग्य तपासणी शिबिरासारखे उपक्रम राबवावेत. अशा उपक्रमांना मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

कणकवलीची बाजारपेठ हे शहराचे ‘हृदय’ आहे. शहर घडत असताना धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळांमुळे शहराचा नावलौकिक वाढतो, असे सांगून त्यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. १९९५ साली मंदिर उभारणीचा संकल्प मोठ्या बजेटचा होता; मात्र शहरातील व्यापारी व नागरिकांच्या सहकार्यामुळे महापुरुष मंदिर उभे राहू शकले, याची आठवण त्यांनी करून दिली. मंदिरासाठी कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास आपण सदैव तत्पर आहोत, असेही त्यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष राजू सापळे म्हणाले, महापुरुष मंदिराचा २५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जात आहे. चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २००२ मध्ये मंडळाने पहिल्यांदा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मंदिर बांधकामानंतर सात वर्षांनी पुन्हा कार्यक्रम झाले आणि आता रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘महापुरुष महाउत्सव’ साजरा होत आहे. या उत्सवासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समीर नलावडे, प्रसाद अंधारी, मेघा गांगण, बंडू हर्णे व राजू सापळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळातर्फे उपस्थित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले, तर आभार महेंद्र सांब्रेकर यांनी मानले.

सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी विविध धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी पावणादेवी समई नृत्य, किंजवडे-देवगड यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या समईनृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ हा प्रयोग रंगला. या प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.