
कणकवली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात तब्बल ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. सुहास पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पावसकर यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबतच आरोग्य क्षेत्रातही मंडळाने पुढाकार घेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. समाजहिताची ही जाणीव आणि कार्यतत्परता कणकवलीकरांकडूनही कौतुकास पात्र ठरत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता सापळे, प्रसाद उर्फ दादा देसाई, उपाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार मंदार सापळे, चेतन अंधारी, वृषभ मीनाकुदळे, सुरज ओरसकर, आबा सापळे, मनोज ठाकूर, सोमनाथ पारकर, श्री. डिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील भारती ठोंबे यांच्यासह कणकवली शहरातील नूतन जनजीवन रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबिरात सहभागी सर्व रक्तदात्यांचे महापुरुष मित्रमंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.










