दोडामार्ग बाजारपेठेतील दुकानाला आग

Edited by: लवू परब
Published on: February 21, 2026 19:56 PM
views 34  views

दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील एका दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग शाॅर्ट सर्किटने लागल्याचे बोलले जात आहे. लगत असलेले दोन गॅसचे सिलेंडर तात्काळ तेथून हलवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, दुकान मालकाचा मिक्सर व इतर किरकोळ साहित्य जळून खाक झाले.

दोडामार्ग बाजारपेठेतील गोवा रोडवरील एका बेकरी दुकानाला शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागताच दुकानातील व्यक्तींनी आरडाओरडा केली. त्यावेळी दुकानातून धूर बाहेर येऊ लागला. लगेतचे नागरिक व दुकान व्यवसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, पोलिस, नगरपंचायतीचे कर्मचारी  घटनास्थळी पोहोचले. आगीजवळच असलेले दोन गॅस सिलेंडर तात्काळ तिथून बाहेर हलवण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे समजतात त्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्याला देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ शहरातील विद्युत पुरवठा बंद केला. 

नगरपंचायतीचा अग्निशामक बमला पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत दुकान मालकाचा एक मिक्सर, भांडी व इतर किरकोळ साहित्य जळून खाक झाले. काही वेळाने मुख्याधिकारी संकेत गायकवाड हेदेखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली.