
वैभववाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. एकूण ४२ उमेदवारी अर्जांपैकी २ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.यामध्ये कोळपे येथून ठाकरे शिवसेनेच्या सुनील नारकर व उंबर्डे पंचायत समितीच्या मैत्री दळवी यांचा अर्ज अवैध झाला असून त्यामुळे ठाकरे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी ४२उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.आज गुरुवारी सकाळी ११वाजल्यापासून पंचायत समिती सभागृहात छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली.या प्रक्रियेची सुरुवात कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून झाली.यामध्ये ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या सुनील नारकर यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे.त्यांनी अर्जासोबत परिपूर्ण शपथपत्र दाखल केले नव्हते.त्यांना नोटीस देऊनही ते वेळेत जमा केले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या मैत्री दळवी यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.त्यांनी मतदार यादीतील नावानुसार अर्ज दाखल केला नसल्याने तो बाद ठरविण्यात आला.
अर्ज अवैध ठरल्यामुळे विशेषतः ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येथील भाजपचे प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
दरम्यान, अर्ज बाद झाल्याने नाराज उमेदवार श्री नारकर यांनी पंचायत समिती सभागृहातून काढता पाय घेतला. एकीकडे कोकीसरे पंचायत समिती सदस्य पदाकरीता ठाकरे शिवसेनेला उमेदवार न मिळाल्याने त्याठिकाणी भाजपाच्या साधना सुधीर नकाशे ह्या बिनविरोध झाल्या आहेत.तर कोळपे येथील श्री नारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ठाकरे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला आहे.










