
सावंतवाडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तालुक्यामधून एकूण दाखल झालेल्या 161 उमेदवार अर्जापैंकी 12 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दाखल 59 अर्जापैकी 5 तर पंचायत समितीच्या 102 अर्जांपैकी 7 अर्ज अवैध ठरले, याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे यांनी दिली.
दरम्यान, 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमकी किती जण आपले अर्ज मागे घेतात यावरून निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या आणि लढत स्पष्ट होणार आहे. सावंतवाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 161 जणांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज काल दाखल केले होते. आज या अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. घारे व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सूचकाची सही आवश्यक कागदपत्रे तसेच एकाच पक्षाचे दोन उमेदवार अशा त्रुटी काढत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील एकूण 12 जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी कोलगावमधून नामदेव नाईक यांनी उबाठा शिवसेनेकडून भरलेला अर्ज तर प्रमोद सावंत यांनी अपक्ष भरलेला अर्ज अवैध ठरला. तळवडेमधून विनोद काजरेकर, माजगाव भगवान गावडे तर इन्सुली मधून चंद्रकांत कोठावळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला.
दरम्यान, पंचायत समिती कलंबिस्तसाठी चंद्रकांत राणे यांनी भरलेला अर्ज अवैध ठरला. मळगाव मधून विक्रम पांगम यांचा अपक्ष तर समीर नेमळेकर यांचा अर्ज अवैध ठरला. माजगावसाठी भगवान गावडे, भरत गावकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला. चराठेमधून शिल्पा म्हापसेकर यांचा अर्ज अवैध ठरला. तांबोळी मधून गायत्री सावंत यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करता एकाच उमेदवाराकडून दोन उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. अशा उमेदवारांचा एकच अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे पंचायत समितीसाठी 88 उमेदवारांचे 81 तर जिल्हा परिषदेसाठी 48 उमेदवारांचे 43 असे एकूण 124 उमेदवार अर्ज वैध ठरले. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात उरणार आणि कोणाची लढत कोणासोबत होणार ? हे स्पष्ट होणार आहे.












