
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाला एक वेगळे महत्त्व असून, काळानुसार या महोत्सवाला नवे स्वरूप देणे आवश्यक आहे. तसेच या महोत्सवात तालुक्यातील लोकसहभाग अधिक प्रमाणात वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
नाधवडे येथे आयोजित वैभववाडी तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजप मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी अशोक वडर, भालचंद्र साठे, बाप्पी मांजरेकर, तुळशीदास रावराणे, बंड्या मांजरेकर, दिगंबर पाटील, बाळा जठार, प्राची तावडे, लीना पांचाळ, श्रद्धा रावराणे, संजय पाताडे, रामचंद्र जंगले यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे पुढे म्हणाले, वैभववाडी तालुक्याची लोकसंख्या सुमारे ३८ हजार इतकी असून, त्या तुलनेत या महोत्सवाला मोठा लोकसहभाग अपेक्षित आहे. या महोत्सवाला एक वेगळी परंपरा असून, त्यामध्ये नावीन्यपूर्ण बदल होणे गरजेचे आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना त्यांनी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांना दिल्या.तसेच शाळा दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. आता तुमचा पालकमंत्री कुटुंबातीलच असल्याने ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रिमेश वाघ यांनी या महोत्सवाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोठा लाभ होत असल्याचे सांगितले. भविष्यात अधिक व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात येईल. जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून, या महोत्सवातून संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाताडे यांनी केले.










