मालवण ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगारांना चार महिने पगार नाही

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 29, 2025 17:57 PM
views 37  views

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने शिवसेनेन याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकदार बदलण्यात यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. शिवसनेच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याचे कबूल केले. 

मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिला जात नसल्याने  कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तिन्ही कामगारांची कुटुंबांची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील काही कामगार हे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने त्यांना घरमालकांनी खोली खाली करण्याचीही सूचना केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गावकर, शेखर गाड, किसन मांजरेकर, तेजस लुडबे, बाळू नाटेकर यासह अन्य उपस्थित होते. 

कर्मचाऱ्याला मानधन देता येत नसेल तर ठेकेदाराने ठेका का घेतला ? कर्मचाऱ्यांचे मानधन वेळच्या वेळी जमा व्हायला हवे. सर्वांचंच कुटुंब असते, कुठून पैसा आणणार ते ? शासनाकडून निधी आला नसेल तरी कर्मचाऱ्यांची उपासमार होते हे दुर्दैवी आहे. त्यासाठी ठेकेदार सक्षम असावा लागतो, शिवाय किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना मानधन मिळायला हवे,  जर कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला,  त्यापेक्षा ठेकेदार बदला अशी मागणी यावेळी पूनम चव्हाण आणि पदाधिकाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र नाही, गणवेश नाही, हे कर्मचारी आहेत हे सर्वसामान्यांनी कसं ओळखायचं ? असाही सवाल पूनम चव्हाण यांनी केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी वस्त यांनी कर्मचाऱ्याने बँक खाते नंबर दिला नसल्याचे सांगितले. याबाबत वारंवार त्याच्याकडे विचारणा करण्यात आल्याचेही सांगितले. मात्र, बँक खात्याबाबबत मला विचारणाचं झाली नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. एखादा कर्मचारी पगार मिळत असेल तर खाते नंबर देणार नाही का ? हे पाटण्यासारखे नसल्याचे पूनम चव्हाण यांनी सांगितले. ठेकेदाराला आज बोलवण्यात यावे असे सांगितले असतानाही तो आला नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या विषयात ठेकेदार टाळाटाळ करत असेल तर ते योग्य नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी ठेकेदाराला फोनवर चर्चा केली. यावेळी दीपक पाटकर यांनी ठेकेदाराशी चर्चा करत कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना सारखेच मानधन देण्यात यावे, शिवाय राहिलेल्या महिन्याचे मानधन तात्काळ देण्याची सूचना केली. त्यावर ठेकेदाराने मानधन लवकरच मानधन जमा करणार असल्याचे स्पष्ट केले.