
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परीषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, तसेच जिल्हा परीषदेच्या विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे. प्रत्येक काम हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी शाश्वत गुणवत्तापूर्ण कामांची आखणी करताना दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड करु नये. तसेच जिल्हा परीषदेला विकासात्मक कामासाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाही तसेच निधी समर्पित होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.










