
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे सुपुत्र व संवेदनशील कवी प्रतीक उत्तम पवार यांच्या ‘पुस्तकांना का घाबरतात माणसं?’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक व 'सद्धम्म' पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग, रुईया मराठी भाषा व वाङ्मय मंडळ आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर सिद्धार्थ तांबे, प्रा. शिल्पा नेवे, डॉ. श्रीधर पवार, प्रा. रामप्रसाद वाव्हळ आणि प्रकाशक सुनील हेतकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रा. देवडेकर म्हणाले, “बुद्ध हा वाङ्मयाचा पहिला महत्त्वाचा समीक्षक असून कवी प्रतीक पवार यांची कविता बुद्धाच्या समीक्षेच्या प्रणालीवर आधारित समताधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेचा विचार मांडते ,असं मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात कवी प्रतीक पवार यांच्या ‘चल बंड करू’ या गीताच्या प्रक्षेपणाने झाली.त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार, सिने अभिनेत्री मेघा घाडगे, देवगिरी महाविद्यालयाच्या प्रा. समिता जाधव, आणि युवा गझलकार अविनाश काठवटे यांच्या शुभेच्छा संदेशांचे प्रक्षेपण करण्यात आले.रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सई कदम व आभा भोसले यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे भावपूर्ण अभिवाचन करून उपस्थितांचे मन जिंकले. अध्यक्षीय भाषणात श्री तांबे म्हणाले, “कवी प्रतीक पवार यांच्या कवितेला शाहिरी बाजाची झालर असून ती लोकशाहीपूरक विचार प्रभावीपणे पेरते.त्यांच्या या कविता समाजातील वास्तवता दर्शक आहेत .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजेश कदम व प्रास्ताविक स्नेहल तांबे आणि आभार विद्यार्थिनी रक्षिता घोले हिने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गचे पदाधिकारी, रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर, उपप्राचार्या डॉ. वैभवी पळसुले, सहाय्यक प्राध्यापिका आश्लेषा राणे, तसेच वाङ्मय मंडळाच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.










