कुर्ली श्री कुर्लादेवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबरला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 04, 2025 11:55 AM
views 28  views

वैभववाडी : तळकोकणातील प्रसिध्द आणि जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या कुर्ली (ता. वैभववाडी) येथील श्री कुर्लादेवीचा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव (टिपर) बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 या उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता ग्रामदेवतांची पूजा करून होणार आहे. त्यानंतर ८.३० वाजता देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येईल. १०.३० वाजता  उत्सव मूर्तीला आभूषण-अलंकार चढविणे, ११ वाजता श्री गणेशपूजन व त्यानंतर ११.३० वाजता देवीची महापूजा होईल. दुपारी १२ वाजता महाआरती आणि सामुदायिक गाऱ्हाणे, तर १२.३० वाजता महाप्रसाद यांचे आयोजन आहे.यानंतर दुपारी १.३० वाजता लोटांगण (नौशिक व सामुदायिक लोटांगण) पार पडेल. सायं. ५.३० वाजता देवीला बारा-पाचांची गाऱ्हाणे करून टवळे ठेवणे, ६ वाजता मानकऱ्यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम, आणि ६.३० वाजता भाविकांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.रात्री ८ वाजल्यापासून नवस फेडण्याचे आणि देवीला बोलावण्याचे कार्यक्रम होतील. मध्यरात्री २ वाजता शिवकळा व देवरहाटी दिंडीचे आगमन, त्यानंतर २.३० वाजता दीपोत्सव (टीपर पाजळणे) आणि ३.३० वाजता पालखी प्रदक्षिणा (मंदिराभोवती पाच फेऱ्या) काढण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजता सामुदायिक गाऱ्हाणे व काकड आरतीने उत्सवाचा समारोप होईल. भाविकांनी या उत्सवात मोठ्या ऊ सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती कुर्ली, मानकरी बारा-पाच आणि कुर्ली ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.