
सभापती सिद्धेश रावराणेंचा अभिनव निर्णय
वैभववाडी : वैभववाडी पंचायत समिती हायटेक होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत सभापती सिद्धेश रावराणे यांनी तालुकावासीयांसाठी अभिनव निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी पंचायत समितीच्या नावाने सोशल मीडियावर अधिकृत खाती सुरू करण्यात आली आहेत.
फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर पंचायत समिती वैभववाडी या नावाने पेज तयार करण्यात आले आहे. या खात्यांद्वारे नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी तसेच सूचना थेट मांडता येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सोशल मीडिया खात्यांचे अनावरण आज मासिक सभेत सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत जलद सेवा पोहोचवण्याचा पंचायत समितीचा हा प्रयत्न असल्याचे श्री रावराणे यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, प्रशासन अधिक गतिमान व उत्तरदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










