
कणकवली : "माजी आमदार वैभव नाईक जे काही करतात, त्याचीच कॉपी सध्याचे सत्ताधारी आमदार करतात. मग तो दशावतारी कलाकारांचा सन्मान असो किंवा शिमगोत्सव. मात्र, निवडणूक संपताच जनतेला विसरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, पराभव स्वीकारूनही जो जनतेच्या सुख-दु:खात उभा राहतो, तोच खरा लोकनेता असतो," अशा शब्दांत ठाकरे गटाचे पदाधिकारी अतुल बंगे यांनी सत्ताधारी आमदारांवर टीकेची झोड उठवली.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बंगे बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या 'कॉपी' करण्याच्या वृत्तीवर मिश्किल आणि खोचक टिप्पणी केली.
नक्कल करण्यातच सत्ताधारी धन्य
बंगे म्हणाले की, वैभव नाईक यांनी दशावतारी कलाकारांना जवळ केले, त्यांना राज्यस्तरीय सन्मान मिळवून दिला, हे पाहून विरोधकांनीही त्याचे अनुकरण केले. वैभव नाईक आपला वाढदिवस अयोध्येत साजरा करणार आहेत, आता तिकडेही आमचे आमदार साहेब जातील, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
'पिशवी' राजकारणावरून टोला
"गणेशोत्सवात वैभव नाईक अगरबत्ती, मोदक पुडा आणि साहित्याची पिशवी ग्रामस्थांना पाठवायचे. त्यांची कॉपी करत विरोधकांनीही ते सुरू केले. मात्र, यावर्षी वैभव नाईकांनी पिशवी पाठवली नाही, तर विरोधकांनीही हात आखडता घेतला. निवडणूक झाली, मते मिळाली, आता जनतेला काही दिले नाही तरी चालेल, अशी सत्ताधाऱ्यांची भावना आहे," असा घणाघात बंगे यांनी केला.
गाडीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा
वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तीला मोटरसायकल भेट देऊन मदतीचा हात दिला. मात्र, याच काळात सत्ताधारी आमदारांना त्यांच्या कुटुंबाकडून एक कोटीची आलिशान गाडी भेट म्हणून मिळते. यावरून सामान्य जनता आणि सत्ताधारी यांच्यातील दरी स्पष्ट होते, असेही बंगे म्हणाले.
शिमगोत्सवाचा निर्धार
"वैभव नाईक यांच्या वाढदिवसाला आम्ही शिमगोत्सव साजरा करतो, ते पाहून विरोधकांनीही तो सुरू केला होता. आता ते सत्तेत असल्याने त्यांना त्याची गरज वाटत नाही, पण आम्ही यावर्षीही मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करणार आहोत," असे अतुल बंगे यांनी ठणकावून सांगितले.
"प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे; हा माणूस पराभव स्वीकारून सुद्धा आजही जनतेसोबत पाय रोवून उभा आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी आमदार म्हणून पुन्हा पुढे गेलेच पाहिजे, हीच जनतेची इच्छा आहे." — अतुल बंगे










