लाकूड वाहतूक करणारा टॅम्पो पलटी

कुचकामी कामामुळे अपघात झाल्याचा आरोप ; ठेकेदाराला घेतलं फैलावर
Edited by: लवू परब
Published on: March 25, 2026 15:27 PM
views 58  views

दोडामार्ग : दोडामार्ग- तिलारी मार्गावर भेडशी येथे लाकूड वाहतूक करणारा टॅम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र गाडीचे नुकसान झाले. रस्त्याच्या कुचकामी कामामुळे हा अपघात झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांनी आरोप करत रस्त्याचा ठेकेदाराला फोनद्वारे संपर्क करून फैलावर घेतले. काही वेळ वातावरण तंग झाले, मात्र क्रेनच्या सहाय्याने गाडी काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग तिलारी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु आहे. याच रस्त्यावरून दोडामार्ग मार्गे भेडशीच्या दिशेने लाकूड वाहतूक करणारा आयशर टॅम्पो लाकडाचा जळाव घेऊन जात होता. भेडशी खालचा बाजार पुलानजिक टॅम्पो पोहचला असता रस्त्याच्या साईड पट्टीवर मातीच्या भरावावर गाडीचे चाक गेल्याने गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात किणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने काम सुरु असल्याचे म्हणत ठेकेदाराला फोनद्वारे संपर्क केला. व चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या कामा संदर्भात चांगलेच फैलावर घेतले. रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराची मनमानी, मोठं मोठे खड्डे, सूचना फलक नसल्याने अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. कालच मंगळवारी याच रस्त्यावर दोन दुचाकीचा अपघात होऊन गोवा येथील एका इस्माला आपला प्राण  गमवावा लागला या सर्व विषयावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.