
वैभववाडी: तालुक्यात आज (ता.१२) पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली.या पावसामुळे घाटामध्ये किरकोळ पडझड झाली होती.मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. गेले आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून तालुक्यात जोरदार हजेरी लावली.विजांच्या गडगडाटासह तालुक्यातील सर्व भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून पडत होत्या.त्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर वाढला.यामुळे नदींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.या पावसामुळे करुळ, भुईबावडा घाटात किरकोळ दरडी कोसळल्या.मात्र त्याचा कोणताही परिणाम वाहतूकीवर झाला नव्हता.दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. भात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.मात्र आजच्या पावसामुळे त्याला दिलासा मिळाला आहे.शेतीच्या कामांना वेग आला आहे.