
वैभववाडी : नगरसेवक रणजित तावडे यांनी गेल्या सव्वा दोन वर्षांत स्वताच्या प्रभागात कोणतेही काम केले नाही. ते सपशेल अपयशी ठरलेत. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावावीत अशी टीका वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी केली.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध समस्यांच्या छायाचित्राचे बॅनर श्री.तावडे यांनी शहरात उभे केले होते.त्यानंतर त्यांनी नगरपंचायतीच्या कारभारावर टीका केली होती. या टीकेला आता श्री.रावराणे यांनी उत्तर दिले आहे. विरोधी नगरसेवक हेच वैभववाडी नगरपंचायतीच्या कामाचे ठेकेदार आहेत हे श्री.तावडे यांनी आपल्या वक्तव्यातुन कबुल केले आहे. त्यावरूनच शासनाच्या पैसा कुणाच्या घशात केला हे स्पष्ट होते. विरोधकांनी आतापर्यत नगरपंचायतीची छुप्या पध्दतीने किती कामे केली आहेत हे देखील आम्हाला नावानिशी स्पष्ट करावे लागेल. शक्य असेल तर त्यांनी सुरूवातीला आपल्या प्रभागातील कामे पुर्ण करून आपले कर्तुत्व सिध्द करावे अशी टीका देखील त्यांनी केली.
याशिवाय शिक्षण व आरोग्य सभापती राजन तांबे यांनी देखील श्री.तावडे यांच्याविरोधात टीका केली. शाळेच्या संरक्षक भिंतीची आवश्यक संमतीपत्र मिळवून देण्यात ते असमर्थ ठरले आहेत. मात्र श्री.दत्तमंदिर शाळेच्या सरक्षंक भिंतीचा प्रश्न आम्ही सोडविला असुन त्याकरीता १४.२४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. श्री.तावडे यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातुन किती विधायक कामे केली हे जाहीर करावे असे आव्हान देखील त्यांनी दिले. तसेच तावडे यांनी अकलेचे तारे तोडू नयेत असा सल्ला देखील दिला.