सावंतवाडीचे वैभव अर्बन बॅंक टी.जी.एस्.बी. सहकारी बॅकेत विलीन होणार : अँड. नकुल पार्सेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2024 08:19 AM
views 177  views

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बॅक, दक्षिण कोकणातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यानां व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा हात देणारी सगळ्यातं जुनी बॅक आहे. स्व. वामनराव कामत आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यानी अतिशय कडक आर्थिक शिस्तीने अनेक वर्षे या बॅकेंचा कारभार ग्राहकाभिमुख केला. स्वत:चे आर्थिक हित व लाभ न पहाता नेहमीच बॅकेच्या हिताचाच विचार केला. त्यांच्या कार्यकाळात बॅक आर्थिक द्रुष्टीने सक्षम होती. मात्र आता ही अर्बन बॅंक टी.जी.एस्.बी. सहकारी बॅकेत विलीन होणार आहे. तशी नामुष्की शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या सहकाराचे प्रचंड ज्ञान असलेल्या संचालकावर आल्याची खोचक टीका सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सावंतवाडीत बॅकेची दिमाखदार वास्तू उभी केली.शाखा विस्तार केला. दरम्यान सावंतवाडी शहरात विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. सावंतवाडीत तेव्हा काही समाजवादी विचारांच्या लोकानां बरोबर घेऊन सावंतवाडी कन्झ्युमर्स सोसायटी, कळसुलकर हायस्कूल आणि सावंतवाडी अर्बन बॅंक जुन्या जाणत्या सेवाभावी लोकांनी समर्पित भावनेने नावारुपाला आणलेल्या संस्थावर वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्या अनेक समर्थकांना पद देवून या तिन्ही संस्थाचा कारभार सुरू झाला. यामध्ये ही अर्बन बॅंक आहे . केसरकर यांनी या बॅकेचा कारभार आपल्या सच्चा समर्थकांच्या मदतीने सुरु केल्यावर गेली सुमारे पंचवीस वर्षे आर्थिक गैरव्यवस्थापन आणि हटवादी  भूमिका यामुळे बॅक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आली. अनेकदा वार्षिक सर्वसाधारण सभेत  बॅकेच्या प्रती अभिमान असलेल्या अनेक सभासदांनी आवाज उठवला. 

संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे बॅंकेची झालेली आर्थिक परिस्थिती यावर ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी मी एकट्याने केसरकर मंत्री असताना त्यांच्या पूर्ण पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढलो. तरीही सत्तेच्या जोरावर हे सर्व सुरुचं होतं. सहा वर्षापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत अपना सहकारी बॅक व जनता सहकारी बॅकेने  विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलेला होता. जनता सहकारी बॅकेचा प्रस्ताव हा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलेला. मी त्याचा साक्षिदार होतो. तो मी व माझ्या काही सहकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मांडला पण या प्रस्तावावर त्यावेळचे स्वतः चेअरमन असलेले केसरकर यांनी भावनिक मुद्दे मांडले 'सावंतवाडी अर्बन बॅक ही या सावंतवाडी शहराचं आणि जिल्ह्याचं वैभव आहे' नंतर हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर पुला खालून बरचं पाणी वाहून गेलं. बॅकेवर सर्व संचालक मंडळ हे केसरकरांचचं होत. बॅकेची आर्थिक उलाढाल मंदावली, ग्राहक कमी झाले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या अटी आणि शर्थीच्या निकषात न बसल्याने एक वर्षापूर्वी भारतीय रिझर्व्ह बॅकेने आर्थिक निर्बंध घातले. दिलेल्या मुदतीत अटी व शर्ती पूर्ण न केल्याने सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या बॅकेचे अखेर टी. जी. एसबी या सहकारी बॅकेत विलीनीकरण करण्याची नामुष्की शिक्षणमंत्री आणि सहकाराचे प्रचंड ज्ञान असलेल्या संचालकावर आल्याची टीका अॅड. नकुल पार्सेकर यांनी केली आहे.