
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक सावंतवाडीच्या मैदानात उतरले. प्रभाग क्रमांक १ मध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. शिवसेनेकडे निष्ठा आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी आहेत. आमचे उमेदवार लोकांकडे जात आहेत. मताला १० हजार वाटतात म्हणून आताच दोन फोन आलेत. दोन्ही पक्षांकडून पाऊस पडत आहे. मालवणात देखील कालचा प्रकार उघड झाला. हेच लोक लोकसभा, विधानसभेला एकत्र पैसे वाटत होते असा टोला त्यांनी लगावला.
तसेच आमच्या उमेदवार सौ.सीमा मठकर सक्षम आहेत. भ्रष्टाचार मुक्त कारभार त्या करू शकतात. आमच्याकडे ताकद कमी असली तरी निष्ठा, प्रामाणिकपणा सोबत आहे. त्यामुळे सावंतवाडीकर आम्हाला निष्ठेने मतदान करतील. दिवसाढवळ्या पैसे वाटले जात असतील तर लोकांनी निवडणूक हाती घेतली पाहिजे. संपत्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. कणकवलीतील भ्रष्टाचारा विरोधात आम्ही लढत असून संदेश पारकर शहरविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पक्षभेद विसरून भ्रष्टाचार रोखण्यासाठी ती आघाडी झाली आहे. दोन पक्षांत आज पैसे वाटपाची स्पर्धा लागली आहे. म्हणून आमचा पर्याय लोकांनी निवडावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले.
यावेळी उबाठा शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर, नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अफरोज राजगुरू, शेखर सुभेदार, समिरा खलिल, देवेंद्र टेमकर, ॲड. अनिल केसरकर, पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, शब्बीर मणियार, अशोक परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











