
कणकवली : काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजप व शिंदे शिवसेनेत कोणाला घ्यायचे हे मी ठरविणार आहे, असे स्टेटमेंट दिले होते. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांना पुन्हा पक्षात घेऊन शिंदे गट सोडाच, पण भाजपमध्येही राणे यांची ताकद नाही, हे पक्षप्रवेशावरून दाखवून दिले, अशी खोचक टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल परब यांच्यावर ड्रग्स व लँड माफिया असे आरोप नारायण राणे यांनी केले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी परब यांना परत उभे करणार नाहीत, असे सांगितले होते. त्याच परब यांना रवींद्र चव्हाण यांनी पक्षात पुन्हा घेतले आहे. त्यामुळे राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे, हे पक्षप्रवेशामुळे दिसून आले आहे. विशाल परब यांच्यावर आरोप करणारे राणे पिता-पुत्र आता परत यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? असा सवालही नाईक यांनी केला आहे.