वाळू माफियांना सत्ताधाऱ्यांचा अभय : वैभव नाईक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 16, 2025 19:59 PM
views 75  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू माफिया हे सत्ताधाºयांचे जवळचे आहेत. सत्ताधाºयांचे वाळू माफियांना अभय असल्याने हे माफिया प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करीत आहेत. अवैध वाळू उत्खनन करणाºयांवर जिल्हा प्रशासनाकडून होत असलेली कारवाई दिखाव्यासाठी आहे, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पालकमंत्री नितेश राणे हे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ते वाळू माफियांच्या बाजूने होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा  राणे वाळू माफियांच्या पाठीशी राहिले. आता ते आपण यापासून वेगळे आहोत, आपण सरकारमध्ये आहोत. आपली प्रतिमा स्वच्छ झाली पाहिजे. यासाठी ते वाळू माफियांच्याविरोधात भूमिका घेत आहेत. त्यांचे भाऊ निलेश राणे हे आमदार आहेत. वाळू माफियांच्याबाबतीत त्यांची भूमिका काय आह? कुडाळ, मालवण किंवा वेंगुर्ले येथे वाळू माफियांचा कुटुंबीयांसोबत सातत्याने त्यांचा वावर असतो.

वाळू माफिया हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मंडळींच्या जवळचे आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त लोकांना दाखवण्यासाठी घोषणा करत आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. सत्ताधाºयांचा पाठिंबा असल्यामुळेच वाळू माफियांमध्ये  हिंमत वाढली आहे.वाळू माफिया कुडाळच्या तहसीलदारांवर गाडी घालण्याची हिंमत केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एमपीडी अ‍ॅक्टद्वारे कारवाई करण्याची घोषणा केली. परंतु जिल्ह्यामध्ये वाळू माफियांवर फक्त दिखाव्यासाठीच कारवाई केली जात असते. कुठलातरी रॅम्प तोडला जातो, कोणावर तरी नोटीस दिली जाते. मात्र, वाळू माफियांवर  एमपीडी अंतर्गत एकही कारवाई केली जात नाही. वाळू माफियांच्याबाबत पालकमंत्र्यांनी नेहमी भूमिका काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान नाईक यांनी दिले आहे.