स्थानिक मंत्र्यांची कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी

वैभव नाईक यांची टीका
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 04, 2024 09:14 AM
views 200  views

कणकवली : लोकसभेची निवडणूक काही दिवसांत जाहीर होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष आम्ही एकत्र महविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत निश्चित झाले आहेत. मात्र या लोकसभेत शिंदे गट आणि भाजपला आमच्या विरोधात अद्यापही उमेदवार मिळत नाही,हे त्यांचे अपयश आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये कुवत नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत अतुल रावराणे , निलम पालव-सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात जनतेचे विविध विकासकामे मार्गी लावली. महामार्ग, चीपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज अशी कामे मार्गी लावली आहेत. सर्वसामन्याचे खासदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या मनातील खासदार म्हणून त्यांची सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ५ मार्चला बैठक होईल या बैठकीत त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणार आहे.