
सावंतवाडी: बांदा मुस्लिमवाडी येथील आफताब कमरुद्दीन शेख या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल करूनही बांदा पोलिसांनी आजही संशयितवर गुन्हा दाखल न केल्याने आज तिसऱ्या दिवशी देखील नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील शवागरात हळविण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. तर आज सकाळी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्या कुटुंबीयाची भेट घेत सांत्वन केले. शिवसेना तुमच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, बांदा पोलीस नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत असून अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले. आफताबने तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करत बांदा शहरातील पाच संशियांची नावे घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यामुळे संबंधितांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलीस प्रशासनाने नातेवाईकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज तिसऱ्या दिवशी देखील मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे. मृताच्या कुटुंबियांकडून आज दुपारी ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकार यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याचेही समजते.










