
दोडामार्ग : मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना पंचवीस लाखांची मदत जाहीर केली होती. वनविभागाने दहा लाखांची मदत दिली असून एकच हत्ती पकडण्यासंदर्भात आदेश दिलेला आहे. मात्र, शासन शेतकऱ्यांची थट्टा करत असून आम्ही मयताच्या वारसांना उर्वरीत पंधरा लाख रुपये लवकर मिळवून देत सर्वच हत्तींना पकडण्याची मागणी करणार. तसेच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्याविषयी आ. अंबादास दानवे यांच्याकडे आग्रही मागणी करणार असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
मोर्ले येथील शेतकरी लक्ष्मण गवस यांच्यावर मंगळवारी सकाळी हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी लक्ष्मण गवस यांचे बंधू, मुलगा विनय यांची बुधवारी दुपारी भेट घेत सांत्वन केले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, दोडामार्ग नगरसेवक चंदन गावकर, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, संदेश वरक, युवासेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, विभाग प्रमुख संतोष मोर्ये, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला उप तालुकाप्रमुख नयनी शेटकर, प्रेमानंद ठाकूर, शुभंकर देसाई, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी वैभव नाईक यांच्यासमोर सारी कैफियत मांडताना ग्रामस्थ म्हणाले, हत्ती पकड मोहीम राबविण्यासंदर्भात शासनाकडे वारंवार मागणी करूनही शासन उदासीन असल्याचे दिसत होते. या भागात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. आमच्या पूर्वजांनी फणस,काजू बागायतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता. आम्ही सुद्धा याच पिकांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. मात्र हत्ती हे सर्व नष्ट करत असून आमचे जगणे मुश्किल झाल्याची कैफियत मांडली. यावेळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे असे म्हणत शासन येथील शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.
शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देणार !
सध्या काजूचा हंगाम सुरू आहे. मात्र हत्तींच्या भीतीमुळे शेतकरी काजू बागेत जाण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या काजू पिकाला सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
घटनेची पुनरावृत्ती झाल्यास मोठे आंदोलन उभारणार
हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. ही कुमक हत्तींना पिटाळून लावण्यास किंवा हत्ती पकड मोहीम राबविण्यास वापरली असती तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा झाला असता. हत्ती मुळे भविष्यात होणारे मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व हत्तींना पकडण्याची मोहीम राबवावी. आमचे शिष्टमंडळ लवकरच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार असून वनविभागाचे प्रधान वनसंरक्षक यांच्यासोबत बैठक लावणार आहे. यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी वैभव नाईक यांनी दिला.
शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे वनविभागाने एका हत्तीला पकडण्याचा आदेश काढला. हि एक प्रकारे येथील शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. कारण जीव जाण्यापूर्वी आदेश निघाला असता तर फायदेशीर ठरले असते. मात्र प्रशासन व सत्ताधारी येथील शेतकऱ्यांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे. या आदेशाची अंमलबजावणी करून हत्तीला त्वरित पकडावे. यात आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. मात्र प्रशासन जर हत्तीला पकडण्यासाठी चालढकलपणा करू लागले तर आम्ही नक्कीच याविरोधात लढा उभारू असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.