छ. शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत : वैभव नाईक

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 20, 2024 09:07 AM
views 69  views

कुडाळ : राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने  वाटचाल करावी असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक  यांनी शिवजयंती सोहळ्यात कुडाळ येथे केले. विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगतदार ठरला. 

   अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन येथील जिजामाता चौक येथे करण्यात आले होते या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी मालवण किल्ल्यावर शिवज्योत घेऊन येणे, ओरोस येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणे, ओरोस ते एस.आर.एम. कॉलेज कुडाळ येथून जिजामाता चौक रॅली काढणे असा भरगच्च कार्यक्रम झाला. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील भाषण व वेशभूषा, पोवाडा, नृत्य, मान्यवरांचे स्वागत, सत्कार समारंभ आणि शिवचरित्रावर आधारित नाटक 'आग्र्याहून सुटका' सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ नगरपंचायत नगरसेविका सई काळप यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत धीरज परब ऍड निलांगी रांगणेकर अनुजा सावंत कुडाळ तालुका युवक अध्यक्ष शिवजन्मोत्सव कमिटी अध्यक्ष शैलेश घोगळे नितीन नेमळेकर अनुजा सावंत सकाळ कुडाळ तालुका प्रतिनिधी अजय सावंत, आशिष काष्टे, अदिती दळवी, रीमा कुडतरकर, भूषण बाक्रे, वैभव जाधव, हर्षद पालव, ममता म्हाडगुत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कथक विशारद नृत्यांगणा मृणाल सावंत व संकल्प क्रीेएशन अकॅडमीच्या चिमुकल्यांच्या गणेश वंदनाने झाली. उत्तरोत्तर हा कार्यक्रम बहरत असतानाच या कार्यक्रमात संकल्प क्रिएशन कुडाळ सिध्दाई डान्स अकॅडमीसह विविध मुलांनी राजे शिवछत्रपती महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा कथाकथन मधून मांडली.  वेशभूषेतून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ झाशीची राणी आदी विविध वेशभूषा साकारत उपस्थित सर्वांनाच या चिमुकल्या कलावंतानी मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्याच्या निमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. ते म्हणाले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे.  त्यांनी अनेक पराक्रम गाजवले ऐतिहासिक पाऊलखुणा  जपताना शिवाजी महाराजांची पाऊले या सिंधुभूमीत पडलेली आहेत प्रत्येकाने जीवनाच्या प्रवाहात वाटचाल करताना आपले राजे शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र त्यांचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने करणे काळाची गरज बनली आहे असे सांगितले. ऍड. सुहास सावंत यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. साडे तीनशे वर्षे आपला महाराष्ट्र परकियांच्या गुलामगिरीत होता. त्यांना बाहेर काढण्याचे काम राजांनी केले. त्यांची प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचे कार्य आजच्या तरुण पिढीच्या हातून घडावे असे आवाहन केले. 

या सोहळ्याला भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत. माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत. बंड्या सावंत. युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट. नगरसेवक उदय मांजरेकर. शिवभक्त रमा नाईक. दुर्गा प्रतिष्ठानचे गणेश नाईक. कृष्णा तेली. मनोज सावंत आदी  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या सोहळ्याचे कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांचा अखिल मराठा महासंघाच्या वतीने  शाल श्रीफळ शिवप्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. चिमुकल्या बालकलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे बहारदार निवेदन बादल चौधरी व केदार राऊळ यांनी केले.