पन्नास कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर धुडकावणारा निष्ठावंत!

कृष्णा धुरी यांनी उलगडला वैभव नाईकांचा 'तो' फोन कॉल
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 25, 2026 18:12 PM
views 91  views

कुडाळ : "ज्यावेळी शिवसेना पक्षात फूट पडली, तेव्हा वैभव नाईक यांच्या दारात ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर चालून आली होती. मात्र, मातोश्रीशी गद्दारी करण्यापेक्षा त्यांनी निष्ठेला महत्त्व दिले. 'आज माझी जी काही किंमत आहे, ती फक्त ठाकरे कुटुंबामुळेच आहे,' असे ठाम उत्तर त्यांनी मला दिले होते," असा खळबळजनक आणि भावनिक खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी कृष्णा धुरी यांनी केला.

कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धुरी यांनी राजकीय संघर्षाच्या काळातील पडद्यामागच्या घडामोडींवर प्रकाश टाकला.

 कृष्णा धुरी यांनी सांगितले की, सत्तांतराच्या काळात वैभव नाईक यांनी स्वतः त्यांना फोन केला होता. "आमदार मला म्हणाले होते की, मंत्रिपद आणि पैशांची मोठी ऑफर आली आहे. त्यांनी मला विचारले, 'काय करू?' मी गमतीने म्हणालो होतो की, संधी आली आहे तर घेऊन टाका. पण वैभव नाईक यांचा विचार वेगळा होता."

 "नाईक यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, जर ठाकरे कुटुंबाने मला आमदार केले नसते, तर आज ही संधी किंवा ही किंमत माझ्यापर्यंत पोहोचलीच नसती. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही," असे धुरी यांनी आवर्जून सांगितले. भविष्यात याच पक्षात राहून मला यापेक्षाही मोठी संधी आणि सन्मान मिळू शकतो, असा विश्वास वैभव नाईक यांनी त्या कठीण काळात व्यक्त केला होता, असेही धुरी म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात आज 'निष्ठावंत आमदार' म्हणून वैभव नाईक यांचे नाव आदराने घेतले जात आहे. भविष्यात त्यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला मिळावे, अशी सदिच्छा यावेळी कृष्णा धुरी यांनी व्यक्त केली.

"५० कोटींच्या ऑफरपेक्षा मातोश्रीची साथ महत्त्वाची मानणारा हा लोकनेता पराभवानंतरही डगमगला नाही. त्यांची निष्ठाच त्यांना पुन्हा मोठ्या उंचीवर घेऊन जाईल."

— कृष्णा धुरी