सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

सेवा प्रभावित नसल्याचा दावा
Edited by: विनायक गांवस
Published on: March 25, 2026 18:38 PM
views 18  views

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची कोल्हापूर सर्किट बेंचसमोर कबुली 

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत अभिनव फाऊंडेशनतर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात रुग्णालयातील १९ पैकी १४ नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची कबुली दिली आहे. मात्र, पर्यायी व्यवस्थेनुसार सध्या २५ अधिकारी कार्यरत असल्याने सेवा प्रभावित झाली नसल्याचा दावाही विभागाने केला आहे.


आरोग्य विभागाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार नियमित पदे रिक्त असली तरी डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार यांच्यासह एकूण २५ वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील कामकाज नियमितपणे सुरू असून रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्त पदे भरण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरावर १४४० पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.


तर सावंतवाडीत मंजूर असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावर अद्यापही स्पष्टता आलेली नाही. ६ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार हे रुग्णालय मंजूर आहे. मात्र, प्रस्तावित जागेबाबत राजघराण्याचे द्वितीय अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर लवकर तोडगा काढण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अभिनव फाऊंडेशनने सुचवलेल्या भटवाडी येथील जागेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल प्राप्त झाला असून त्याबाबत मुंबई आयुक्तालय संचालकांचे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. तसेच, जुनी कुटीर रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणे शक्य असल्याचा अभिप्राय बांधकाम विभागाने दिला असला तरी त्यावरही शासनाकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.


आरोग्य विभागाने प्रतिज्ञापत्रात डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली असली तरी रक्तपेढीतील रिक्त पदे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच, न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालावर प्रशासनाने नेमकी काय ठोस कार्यवाही केली ? हे अद्याप उघड केलेले नाही. अभिनव फाऊंडेशनचे वकील महेश राऊळ यांना आज हे प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले असून आगामी सुनावणीत यावर काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.