सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याची भूमिका घेतली आहे.त्याचबरोबर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीतही नितेश राणेंनी भ्रष्टाचारावरून अधिकाऱ्यांना झापले. त्यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु जिल्हा नियोजन बैठक झाल्यानंतर सायंकाळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील २ अधिकाऱ्यांनी लाच घेण्याबाबत डील केली. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा उपनिबंधक वर्ग १ चे अधिकारी माणिक सांगळे व कार्यालय अधीक्षक वर्ग ३ च्या अधिकारी उर्मिला यादव हे दोन्ही अधिकारी ३३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडले आहेत.
पालकमंत्र्यांच्या कडक भूमिकेनंतरही अधिकारी भ्रष्टाचार करत असतील, पालकमंत्र्यांना जुमानत नसतील तर अधिकाऱ्यांना अभय कोणाचे आहे? जिल्हयात मटका, गुटखा आणि अवैध दारु विक्रीवर कारवाई सुरु आहे. अवैध वाळूवर देखील कारवाई करण्यात आली. मात्र आता वाळू व्यवसायिकांकडून डंपरमागे ३ हजाराचा हप्ता घेतला जातोय. त्यामुळे पालकमंत्र्यांची हि भूमिका खरोखरच अवैध धंदे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आहे कि केवळ जनतेच्या दिखाव्यासाठी कारवाईचा फार्स केला जात आहे. असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.