नौसेना दिन खर्च ; वैभव नाईकांच्या आरोपांवर प्रशासनाचा खुलासा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 24, 2024 15:02 PM
views 187  views

सिंधुदुर्गनगरी  : नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशभरातील अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी यांचे वास्तव्य होते. या भव्य कार्यक्रम आयोजित करताना प्रशासकीय दृष्ट्या खर्चाची तरतूद करणेसाठी विशेष बाब म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला होता. शासनाकडून जिल्हा नियोजन समितीचे मंजूर निधीमधुन एक वेळची विशेष बाब म्हणून रक्कम रू. 554.00 लक्ष निधीस मान्यता देणेत आली. यावरून आमदार वैभव नाईक यांनी या खर्चाची यादी वाचत आरोप केले होते. आता प्रशासनाने त्यावर खुलासा केलाय. 

प्रशासनाचा खुलासा असा !

 या शासन मान्यतेच्या अधिन राहून; 1) विद्युत विभाग, रायगड यांना रू. 74.09 लाख, 2) पोलिस अधिक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग यांना एकूण रू. 161.88 लाख, 3) निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य शाखा, सिंधदुर्ग यांना एकूण रू. 91.70 लाख  4) महावितरण विभाग, सिंधुदुर्ग यांना रू. 42.83 लाख. 5) जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांना रू.दीड लाख, असे एकूण रू.372.00 लाख निधी वितरीत करण्यात आला.

या निधीचा वापर निवास व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहने भाड्याने घेणे, चित्रिकरण करणे, चहापाणी, बंदोबस्ताच्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे अधिग्रहण करणे, तहसिलदार मालवण, वेंगुर्ला, कणकवली यांचेकडील निवास भोजन व सेफ हाऊस खर्च, स्टेशनरी खर्च इ. करिता करणेत आला असून झालेल्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित यंत्रणांकडून शासनास सादर केली आहेत. सदर उपयोगिता प्रमाणपत्राबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेणेत आलेला नाही. प्रत्यक्ष शासन मंजूर निधी पेक्षा कमी निधी खर्ची पडला आहे ही वस्तुस्थिती आहे. एकवेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून मान्यताप्राप्त निधीच्या रकमेपेक्षा प्रत्यक्ष वितरीत रक्कम कमी आहे याबाबत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा खुलासा प्रशासनाने केलाय.