जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वाढ ?

तस्करी रोखण्यासाठी 'फायंडींग स्कॉड' तैनात : गृहमंत्री फडणवीस विधानसभेत आ. नाईकांकडून प्रश्न उपस्थित
Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2024 13:50 PM
views 328  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री दिवसेंदिवस वाढत असल्याबाबतचा अतारांकीत प्रश्न  कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत उपस्थित केला‌. गोवा राज्यात अंमली पदार्थाविरोधात मोहीम हाती घेतल्यानं गेल्या काही दिवसांपासून विदेशी पर्यटक सिंधुदुर्गला आपला रेव्ह पार्टिचा अड्डा बनवित असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.‌ यावर हे खरे नसून अंमली पदार्थांची विक्री तसेच वाहतूक होऊ नये याकरीता गोवा, कर्नाटक सीमेलगतच्या पोलीस ठाण्यांना सक्त सूचना देण्यात आल्यात. तस्करी रोखण्यासाठी चेक पोस्ट फायंडींग स्कॉड, जिल्हा स्तरावर अँटी नार्कोटीस सेल निर्माण केल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिली‌.

आ. नाईक यांनी विदेशी पर्यटक सिंधुदुर्गात गुगल मॅपच्या सहाय्याने ड्रग्ज एजंटपर्यंत पोहचत असल्याचा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, अंमली पदार्थांची विक्री तसेच वाहतूक होऊ नये या करीता गोवा तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांना सक्त सूचना देण्यात आल्यात. जिल्ह्याच्या सिमेलगतच्या भागात बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग हद्दीतून जाणारे बॉर्डरवर बांदा, सातार्डा, आरोंदा, रेडी, बिजघर एकूण ५ चेक पोस्ट उभारण्यात आलेले असून त्या ठिकाणी २४ तास अधिकारी व अंमलदार हे अंमली पदार्थाची अवैध वाहतुक होऊ नये याकरीता ये-जा करणाऱ्या वाहनांची तसचे पर्यटकांची तपासणी करीत असतात. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाची तस्करीचे संबंधाने चेक पोस्ट फायंडींग स्कॉड तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये १ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, २ महिला पोलीस अंमलदार, नायब तहसिलदार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी आहेत. तसेच जिल्हा स्तरावर अँटी नार्कोटीस सेल निर्माण करण्यात आलेला असून त्यामध्ये २ अधिकारी व ५ अंमलदार कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती व नार्को को. ऑर्डर्डीनेशन बैठक दर महिन्यात आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागामध्ये समन्वय ठेऊन व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील तरुणांना ड्रग्ज, गांजा पुरविणा-या टोळीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी अप्पर पोलीस अधिक्षकांकडे केली होती‌. या टोळीवर कोणती कारवाई केली ? तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कोणत्या सक्षम उपाययोजना केल्यात असा सवाल आ. नाईक यांनी केला. यावर उत्तर देताना २४ तास अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थांची अवैध वाहतुक रोखण्यासाठी कार्यरत आहेत.  फिरते पथक तयार करण्यात आले आहे. अंमली पदार्थाचा वापर रोखण्यासाठी सर्व विभागामध्ये समन्वय ठेऊन व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.