
दोडामार्ग : शेवटच्या दोन दिवसात मतदार विकत घेण्यासाठी चढावोढ लागणार आणि आपला मतदार आपल्या तालुक्याचा विकास गहाण टाकणार काय ? असा प्रश्न दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रूप चे अध्यक्ष वैभव इनामदार यांनी निर्माण केला आहे.
काही बोटावर मोजण्या सारखे मतदार आहेत ते विकले जात नाहीत. आज कोणतीही निवडणूक लढवणे सोपे राहिले नाही, ज्याच्या कडे अफाट धनशक्ती आहे तीच व्यक्ती निवडणूक लढवू शकते. निवडणुकांमध्ये विकास हा मुद्दा फक्त भाषणासाठी मर्यादीत राहिला आहे. प्रत्यक्षात मात्र त्या विकासाचे काम धनलक्ष्मी करते. समाजाविषयी तळमळ असेल आणि अर्थिक पाठबळ नसेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. निवडणुकीत कुठलीही पर्वा न करता आपण मतदार विकलो जातो.आणि निवडणुका संपल्या की विकास होत नाही असे परखड मत व्यक्त करत असतो. मात्र त्यावेळी वेळ गेलेली असते.आपण मतदान केलेच पाहिजे तो आपला हक्क आहे. पण आपण ज्याला मतदान करतो तो आपल्या तालुक्याचा विकास करण्यास योग्य आहे काय ?, तो उमेदवार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार काय ?, तो उमेदवार तालुक्याची पर्यटन निर्मिती करू शकतो काय ?, तो उमेदवार तालुक्यातील ढिसाळ आरोग्य सेवा सुदृढ करू शकतो काय ?, याचा विचार तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने आणि प्रामुख्याने युवकांनी विचार करणे गरजेचे आहे.
५०० आणि १००० रुपयाला बळी न पडता खऱ्या अर्थाने, रोजगार, आरोग्य, पर्यटन सुदृढ करण्यासाठी मतदान करा.असे आव्हान करत. मतदानाविषयी आपले परखड मत प्रेस नोटद्वारे दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप अध्यक्ष वैभव इनामदार यांनी मांडले आहे.