खान सरांचं खासगी आदर्श वाचनालय : उषा परब

Edited by: विनायक गावस
Published on: November 20, 2023 13:14 PM
views 103  views

सावंतवाडी : महाराष्ट्र संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या व ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब यांनी प्रा. अल्ताफ खान यांच्या ग्रंथ संग्रहालयाला नुकतीच भेट दिली.

यावेळी सौ उषा परब म्हणाल्या, खान सरांचं खाजगी वाचनालय एक आदर्श वाचनालय आहे. मी मुद्दाम ते पाहण्यासाठी गेले आणि धन्य झाले. इतका वेचिव व दुर्मिळ पुस्तक संग्रह एखाद्या सार्वजनिक वाचनालयातही सापडणार नाही असं वाटलं. आणि त्या पुस्तकांची मांडणी इतकी सुंदररीत्या केली आहे की खजिन्यातील दागिने पहावेत तस त्या पुस्तकांकडे पाहत राहावंसं वाटतं. तिथे वेद आहेत . जुने ग्रंथ आहेत. प्राचीन साहित्य आहे. पाली प्राकृत भाषेपासून अद्यावत भाषेपर्यंतची अनेक पुस्तके अभ्यासूंसाठी उपलब्ध आहेत.


सौ परब म्हणाल्या, तिथे शिवाजी आहे आणि औरंगजेब सुद्धा. तिथे कबीर तुलसीदास आहे आणि ज्ञानेश्वर तुकाराम सुद्धा . तिथे उर्दू शाहिरी आहे आणि मराठी कवी सुद्धा. अण्णाभाऊ साठे असतील पु.ल असतील विश्वासराव पाटील असतील अशा त्यांच्या अनेक आवडत्या लेखकांची सारे साहित्य संपदा एकेका कपाटात शिस्तबद्ध आहे. साहित्यसंपदेतील अनेक खंड सिरीयल प्रमाणे लावलेले आहेत.


मराठी भाषेचा सगळा इतिहास पुस्तक रूपाने तिथे उभा ठाकलाय असं वाटतं अर्थात हिंदी साहित्याचा सन्मान तिथे कमी नाही. पुस्तक प्रेम किती कसं असावं याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खान सर ही. सारी साहित्य संपत्ती त्यांनी जिवापाड जपली आहे. वाढवली आहे आणि प्राणपणाने त्याची काळजी ही घेत आहेत. मला वाटतं पुस्तक हाच त्यांचा ब्रम्हानंद हेच त्यांचं खरं जगणं असावं त्यांच्या या व्यासंगाला वंदन करावेसे वाटते, असे त्या म्हणाल्या.