दोडामार्ग नगरपंचायतीत गदारोळ

नगराध्यक्ष - नागरिकांमध्ये हमरातुमरी
Edited by: लवू परब
Published on: June 12, 2025 20:03 PM
views 346  views

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतिच्या सुनावणी वेळी नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नागरिकांमध्ये हमरातुमरी होऊन मोठा गदारोळ झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी विकास आराखड्याला कडाडून विरोध करत आम्हाला विश्वासात नघेता केलेला विकास आराखडा रद्द करा व आम्हाला विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करा. आमचा विकासाला विरोध माही मात्र विश्वासात नघेता जो विकास चालू आहे त्याला आमचा विरोध कायम राहिल असे मत यावेळी नगरपंचायतच्या विकास आराखड्याच्या सुनावणीला आलेल्या नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी 100 हुन अधिक हरकती नोंदविण्यात आले.

नगरपंचायत कार्यालयात गुरूवारी प्रारूप विकास आराखडा संदर्भातील हरकतींच्या अनुषंगाने सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने शुक्रवारी दि. १३ रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरीकर,  मुख्याधिकारी संकेत गायकवाड, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.जय सामंत, सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचना विभाग अनिलकुमार पाटील व सेवानिवृत्त नगर रचनाकार शेखर चव्हाण आदी उपस्थित होते.

आराखड्याबाबत हरकती घेण्यास सुरूवात झाली. उपस्थित नागरिकांनी अनेक सवाल उपस्थित करत नगरपंचायत प्रशासनाला कैचीत पकडण्यास सुरूवात केली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन न झाल्याने ते संतप्त झाले. संदिप गवस म्हणाले, आमच्या जमिनी वडिलोपार्जित आहेत. आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या जमिनी बळकावून, हिसकावून किंवा चुकीच्या पद्धतीने त्या घेऊन विकास करू नये. शिवाय आमच्या सातबाऱ्यावर ग्रीन झोनचा उल्लेख नसताना प्रारूप विकास आराखड्याच्या मॅपवर आमच्या जमिनींवर ग्रीन झोन आलाच कसा ? त्यामुळे नगरपंचायत कडून अशाप्रकारे आमचे नुकसान करून जर विकास करत असाल तर त्यापेक्षा आमची पूर्वीची ग्रामपंचायतच राहु दे आम्हाला नगरपंचायत नको? असा सांगून प्रारूप आराखड्यावर संताप व्यक्त केला व त्याला हरकत केली. तसेच त्यांनी नगरपंचायत प्रशासन व नगररचना विभाग यांच्यावर रोष व्यक्त करत केला. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील त्यांना सहमती दर्शव्य प्रारूप आराखड्याला विरोध दर्शविला. 


मी न्याय द्यायला सक्षम आहे : नगराध्यक्ष 

प्रारूप विकास आराखड्याच्या मुद्द्यांवरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरध्यक्ष चव्हाण व अधिकारी यांच्या व्यासपीठाच्या अगदी जवळ येत आक्षेप घेतले. शिवाय त्या ठिकाणी मोठ मोठ्याने बोल्याने वादंग निर्माण होण्याचा प्रकार घडला. त्यावेळी नगरध्यक्ष चव्हाण यांनी देखील आपण सर्वांच्या हरकतींचे निरसन करण्यास सक्षम असून न्याय देणार आहे. मात्र आम्हाला तुमचा न्याय नको आहे हा प्रारूप विकास आराखडाच रद्द करा अशी मागणी निलेश गवस, संदीप गवस, दीपक म्हावळंकर केली. मात्र नगरध्यक्ष चव्हाण म्हणाले की, तुम्ही एका एकाने येत शांततेत तुमचे म्हणणे मांडा आम्ही त्याचे निरसन करू असे स्पष्ट केले. 

नगरपंचायत मध्ये सतरा नगरसेवक आहेत, त्यापैकी एकही नगरसेवकांच्या जमिनीत ग्रीन झोन कसे नाही? फक्त सामान्य नागरिकांच्या जमिनीतच कसे ग्रीन झोन घालण्यात आले? असा सवाल उपस्थित नागरिक संदीप गवस यांच्याकडून विचारण्यात आला. मात्र यावेळी नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले की, ग्रीन झोन हा वनविभाग मार्फत घातलेला असतो तो आम्ही घालत नाही असे स्पष्ट केले. मात्र यावर नागरिकांचे समाधान झाले नाही. तसेच नागरिकांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा बनवा अशी मागणी एकमुखाने उपस्थित नागरिकांनी केली.