
देवगड : तालुक्यातील देवगड शहरातून राज्य मार्ग क्रमांक ४ पासून व मिठमुंबरी, तारामुंबरीमार्गे कुणकेश्वर देवस्थानपर्यंत राज्य मार्ग १७८ ला मिळणाऱ्या इ.जि.मा. १७८ या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्यत्यारीमध्ये असलेल्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरीक व पर्यटक भाविकांमधून तीव्र प्रतिक्रीया उमटत होत्या. याबाबत ''खासदार, आमदार, नगराध्यक्ष यांचेसह अधिकाऱ्यांना सदर रस्ता सुसज्ज करण्याची बुद्धी दे!" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती.
याबाबत आमदार नितेश राणे यांनी त्वरीत दोन्ही बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, इ.जि.मा. १७८ हा एकूण ६ किलोमीटर लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दर्जोन्नती करून वर्ग करण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागणीपत्र सादर केले. सदर प्रस्तावास मंत्री चव्हाण यांनी त्वरीत मंजूरी दिली व एक महिन्याच्या आत दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासनाने या रस्त्याच्या दर्जोन्नती बाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
कोकणची दक्षिण काशी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर या पर्यटन स्थळाकडे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरामध्ये राबविलेल्या वॅक्स म्युझिअम, पवनचक्की गार्डन, कंटेनर थिएटर यामुळे देवगड शहरामध्येही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. आता देवगड - कुणकेश्वर जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविक व पर्यटक यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाल्यावर त्याच्या सुधारणेसाठी प्रादेशिक पर्यटन विकासमधून प्रस्ताव सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड, उपअभियंता श्री. बासूतकर यांना आम. राणे यांनी सूचना केल्या असून निधी उपलब्धतेसाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व रवींद्र चव्हाण यांचेशी संपर्क साधला आहे. येत्या महाशिवरात्री यात्रेपूर्वी हा रस्ता दर्जेदार डांबरीकरणाद्वारे पूर्ण करण्यात येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.