
सावंतवाडी : आगामी न.प. निवडणूकांसह इतर या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर लढवल्या जाणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ ही या मागणीला साथ देतील त्यामुळे सावंतवाडीत भाजपाचा नगराध्यक्ष बसवून कमळ फुलवणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी व्यक्त केला. ज्या लोकांना राजकारणात भाजपने पद, चेहरा आणि ओळख दिली तेच आज भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, भाजपा त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते फोडणे सहज शक्य नाही असा टोलाही त्यांनी मित्रपक्षाला लगावला. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम भोसले, जेष्ठ कार्यकर्ते पुखराज पुरोहित, मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, माजी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, राजू बेग, अनिल निरवडेकर, आनंद नेवगी, उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सारंग पुढे म्हणाले, प्रदेश पातळीवर तसेच जिल्हा कोअर कमिटीच्या माध्यमातून सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नव्याने सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील अन्य दोन मंडल अध्यक्षांची ही निवड उद्यापर्यंत जाहीर होणार आहे. शहर मंडल अध्यक्षाची नव्याने निवड करत असताना आगामी काळात शहराचा सर्वांगीण विकास नजरेसमोर ठेवून तशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक बूथ स्तरावरील समस्या जाणून घेऊन तेथील विकासकामे यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. याचबरोबर शहरातील समस्या यामध्ये प्रामुख्याने शहराच्या सीमावर्ती भागातील कचऱ्याची समस्या तसेच ड्रेनेजची समस्या आधी सोडवण्यादृष्टीने या पुढील काम राहणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी याआधी मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात आला आहे यापुढेही अधिक जास्त मोठा निधी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवल्या जाणार आहे. सध्या तरी शिवसेनेची युती करण्यासाठी स्थानिक पातळीवरील एकही कार्यकर्ता तयार नाही. तशा प्रकारची मागणी ही आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे. या मागणीला वरिष्ठ साथ देणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेवर कमळ फुलवून भाजपचाच नगराध्यक्ष बसवला जाणार आहे. आंबोली आणि शिरशिंगे या ठिकाणी झालेला शिवसेनेतील प्रवेश हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा नव्हता असही त्यांनी स्पष्ट केले.