कोटकामतेत महावितरणकडून जिल्हा मार्गांवर विनापरवाना काम

ग्रामपंचायत - ग्रामस्थ यांच्याकडून देवगड पोलीस ठाण्यात निवेदन
Edited by:
Published on: June 07, 2025 14:12 PM
views 134  views

देवगड : ग्रामपंचायत कोटकामते ग्रामस्थ यांच्यावतीने देवगड पोलीस ठाणे येथे महावितरण कडून प्र.जि.मा.14 या रस्त्यावरती विना परवानगी असलेल्या कामाबाबत निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, महावितरण विभागामार्फत प्र.जि.मा. १४ या रस्त्यावर भूमिगत नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. सदर कामाच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार आपल्या कार्यालयात प्राप्त झाली असून, त्या अनुषंगाने दिनांक ०३जून २०२५ रोजी काही ग्रामस्थांना आपल्याकडे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडली. त्यावेळी आपल्यामार्फत असे सांगण्यात आले की हे शासनाचे काम आहे आणि त्यात अडथळा निर्माण करू नये.


मात्र, ग्रामपंचायतीमार्फत आपणांस कळविण्यात येते की, ग्रामस्थांनी सदर कामात कुठलाही अडथळा निर्माण केलेला नाही. केवळ कामासाठी आवश्यक असलेल्या परवानगीची विचारणा केली असता, संबंधित ठेकेदाराकडे कोणतीही वैध शासकीय परवानगी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.


सदर ठिकाणी अनेक ठिकाणी रस्ता खोदून तसेच खड्डे बुजविल्याशिवाय ठेवले असून, पावसामुळे माती वाहून खड्‌डे रस्त्यावर उघडे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. किंबहुना अपघात झालेले आहेत. सदर बाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी देखील खोदकामास कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे समजले. अधिक माहिती साठी  अभियंता बांधकाम विभाग निकाळजे  ह्यांचेशी संपर्क साधणे, अशा परिस्थितीत, संबंधित ठेकेदाराने काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक शासकीय परवानग्या प्राप्त करून त्यांची प्रत ग्रामपंचायतीकडे सादर करणे अपेक्षित आहे. परंतु त्याऐवजी ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात बोलावून "शासनाचे काम आहे, अडथळा करू नका" असे सांगितले जाणे हे योग्य वाटत नाही. या निवेदनाव्दारे आपणांस विनंती करण्यात येते की, संबंधित ठेकेदाराकडून सर्व वैध परवानग्या प्राप्त करूनच कामास अनुमती द्यावी, व ग्रामस्थांबाबत गैरसमज न निर्माण करता वस्तुस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी.