
दापोली : दापोली तालुक्यातील वळणे येथून एका बैलाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोन संशयिताविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर काल रात्री संतप्त झालेले नागरिक दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमले झाले होते मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढली असून कारवाई करण्याची हमी दिल्यावर जमाव पांगला.
याबाबत दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात्तून मिळालेल्या माहितीनुसार काल १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजणेचे सुमारास दापोली तालुक्यातील वळणे येथील एक बैल एका वाहनात भरून नेला जात असल्याची माहिती वळणे गावचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नरेश नारायण मोहिते यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या सहकार्यांना घेवून या वाहनाचा पाठलाग सुरु केला व हे वाहन गावरई बौद्धवाडी येथे थांबवले. या वाहनाची पाहणी केली असता त्यांना त्यात एक बैल आढळून आला. या बैलाला या वाहनात पुरेशी हालचालहि करता येत नव्हती. या संदर्भात नरेश मोहिते यांनी दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यादव यांना माहिती दिल्यावर ते गावरई येथे दाखल झाले. मात्र सदर गाव हे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते वाहन व वाहनात असलेल्या व्यक्तींना दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हा बैल वळणे येथील सुरेश गणपत मोहिते यांनी टेटवली येथील अब्दुल रौफ माखजनकर यांना विकला होता व माखजनकर हे त्यांचे वाहन क्रमांक एमएच.०३. डीव्ही. ९३२६ मधून या बैलाची वाहतूक कत्तल करण्यासाठी करत असल्याचा संशय नरेश मोहिते यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीवरून सुरेश गणपत मोहिते व अब्दुल रौफ माखजनकर या दोन्ही संशयीताविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात्त प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचे परीवहन अधिनियम १९७८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघानाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर बैलासह वाहनही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.
रत्नागिरी येथील गोवंशाची हत्येचे प्रकरण ताजे असल्याने व विनापरवाना गोवंशाची वाहतूक केल्याची माहिती दाभोळ व दापोली परिसरातील हिंदुत्ववादी नागरिकाना मिळाल्यावर त्यांनी दाभोळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे मोठा जमाव जमला होता. दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व दाभोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी योग्य प्रकारे परिस्थिती हाताळून उपस्थित नागरिकांची समजूत काढल्यावर जमाव पांगला व वातावरण शांत झाले.