सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा एकता मेळावा 31 जानेवारीला

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना निमंत्रण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 04, 2024 19:32 PM
views 270  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने गुरूवारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी बांधवांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन स्टॉल उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी महासंघाच्यावतीने मंत्री राणे यांच्याकडे करण्यात आले.


सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा परंपरेस अनुसरून ३१ जानेवारी रोजी होणार आहे.  मालवणच्या बोडींग मैदान याठिकाणी मेळावा संपन्न होणार आहे. यंदा यजमान मालवण व्यापारी संघाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष ही आहे. हे औचित्य साधून २७ ते ३० जानेवारी या कालावधीत भव्य व्यापार व पर्यटन प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणाऱ्या या व्यापारी एकता मेळाव्यास सिंधुदुर्गाचे सुपुत्र व प्रतिथयश उद्योजक नात्याने आणि केंद्रीय उद्योगमंत्री या अधिकारात प्रमुख मान्यवर निमंत्रीत म्हणून प्रत्यक्ष सहभागी होऊन व्यापारी बांधवांना संबोधित करावे, अशी आग्रहाची विनंती यावेळी महासंघाच्यावतीने करण्यात आली. आपण या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्विकार करून मेळाव्यात सहभागी होऊन सिंधुदुर्गातील हजारो व्यापारी बांधवांना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ द्यावा, असेही यावेळी व्यापारी महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.


यावेळी व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर, राजन नाईक, संजय भोगटे, महेश नार्वेकर, मालवण शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, परशुराम पाटकर, हर्षल बांदेकर, खजिनदार गणेश प्रभूलकर, विजय केनवडेकर, सहसचिव अभय कदम, सरदार ताजर, अमोल केळूसकर, हरेश देऊलकर, अखिलेश शिंदे, संभव कुडाळकर, राजेश पारकर आदी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापार वाढ व विविध विषयावर आपुलकीने चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या योजनांची माहिती दिली. आवश्यक ते सर्व सहकार्य आपल्या वतीने दिले जाईल असे सांगत मेळाव्यात व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात आपण निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले.


फोटो : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण यांची भेट घेऊन 31 जानेवारी रोजी मालवण येथे होणाऱ्या व्यापारी मेळाव्याचे निमंत्रण देत संवाद साधला.